पुण्यातून केरळसाठी थेट रेल्वे सेवा, तिकीट आरक्षणास सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव घटला आहे. डिसेंबर महिन्यात देशांतर्गत पर्यटनाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पुणेकरांसाठी रेल्वे विभागाने एक चांगली बातमी दिली आहे. मार्चनंतर पहिल्यांदाच पुणे-एर्नाकुलम मार्गावर एक्स्प्रेस धावणार असून, प्रवाशांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.

केरळ राज्य नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असून, तेथे पर्यटनाला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. कायमच प्रवाशांची गर्दी असणाऱ्या पुण्यातील अनेक गाड्यांपैकी ‘पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस’ ही गाडी आहे. ही गाडी धावणार असल्याने प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

दर बुधवारी (२७ डिसेंबरपासून) आणि रविवारी सायंकाळी पावणेसात वाजता ही गाडी पुण्यातून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी एर्नाकुलमला पोहोचेल. एर्नाकुलम येथून दर शुक्रवारी आणि मंगळवारी पहाटे सव्वापाचला गाडी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून ५० मिनिटांनी पुण्यात दाखल होईल.

या गाडीला सुरुवातीच्या स्थानकांव्यतिरिक्त पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, कुडाळ, मडगाव, कारवार, उडुपी, मंगळुरू, कासरगोड, कन्नूर, थलसेरी, कोझिकोड, तिरूर, शोरानूर, थ्रिसूर आदी थांबे आहेत. या गाडीच्या तिकिटांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

दरम्यान, पुण्यातून उड्डाणांची वेळ आणि संख्या कमी झाल्यापासून, अर्थात ऑक्टोबरच्या अखेरपासून पुण्यातून कोचीला जाणारे उड्डाण बंद आहे. त्यामुळे पर्यटकांना केरळला जाण्यासाठी ‘कनेक्टिंग’ उड्डाणांवर अवलंबून राहावे लागले. रेल्वेची सेवा बंदच होती. आता विमान नाही; परंतु थेट रेल्वे सुरू झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.