वाशिममध्ये खासदार-आमदारांमध्ये राडा; एकमेकांविरुद्ध दिल्या पोलिसांकडे तक्रारी

वाशिम : वाशिममध्ये (washim) खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणात खासदार आणि आमदारांनी परस्परविरोधात तक्रार दिल्या आहेत. वाशिम (washim) येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभा सुरु होण्यापूर्वी खासदार भावना गवळी आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या गुंठेवारी शेतकर्‍यांची समस्या निकाली काढण्यावरुन चर्चा सुरु होती. त्याचवेळी आमदार राजेंद्र पाटणी तेथे आले.

मी गुंठेवारी सुरु होऊ देणार नाही, असे भावना गवळी म्हणाल्या. यावेळी पाटणी आणि गवळी यांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिम पोलिसांकडे खासदार भावना गवळी यांच्या विरुद्ध तक्रार दिली. हे समजताच आमदार समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी शहरात भावना गवळी यांचे पोस्टर व टायर जाळून निषेध केला. त्याचदरम्यान खासदार समर्थक शिवसैनिक हे घटनास्थळी आले. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांची समजूत घालून त्यांना दूर केले.

पोलीस ठाण्यात आमदार आणि खासदार यांनी एकाच दिवशी एकमेकांविरुद्ध तक्रार केली आहे. मी गुंठेवारी सुरु होऊ देणार नाही. मी महिला असताना त्यांनी माझ्यासोबत हुज्जत घातली. त्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली असल्याचे खासदार भावना गवळी यांनी सांगितले. या प्रकाराची संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर चर्चा सुरु आहे.