राम मंदिरासाठी देणगी जमा करणाऱ्या संघाच्या जिल्हा संचालकावर गोळीबार

कोटा/राजस्थान : वृत्तसंस्था – अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरासाठी देशभरात देणगी गोळा केली जात आहे. यासाठी एक मोहिम सुरु करण्यात आली आहे. याला देशातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा संचालकावर गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील कोटा येथे घडली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना मंगळवारी (दि.9) मध्यरात्री घडली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) जिल्हा संचालक दीपक शाह हे राम मंदिरासाठी सायंकाळी 6 ते 7 या दरम्यान देणगी गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र काही जणांनी शाह यांना देणगी गोळा करण्यापासून रोखले. त्यांना देणगी गोळा करुन नका असा इशारा दिला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन शाह यांनी देणगी गोळा करण्याचे काम सुरु ठेवले. यानंतर शाह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

दीपक शाह यांना एमबीएस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत दीपक शाह यांच्या पायला दोन गोळ्या लागल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कोटा येथील रामगंज मंडी भागातील झालवाडामधून तीन जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर या भागातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.