विद्या चव्हाणांनी विधानभवनात प्रवेश करणाऱ्या रावतेंना रोखून विचारला ‘हा’ जाब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिवाळी अधिवेशनाची आजची सुरुवात विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीने झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना रोखून ओला-उबेर संपाबाबात जाब विचारला.
दिवाळीची डेडलाइन उलटून गेल्यानंतरही सरकारने १३ मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ओला, उबेर चालकांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. या संपाविषयी आमदार विद्या चव्हाण यांनी रावतेंना धारेवर धरलं. या संपामुळे सामान्यांचे नव्हे तर आमदारांचेही हाल होत असल्याचं चव्हाणांनी रावतेंना सांगितलं.
रावतेंचा काढता पाय 
यावर रावतेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत चिडून कोण ओला-उबेर ? कोणी दिली त्यांना परवानगी असा उलट प्रश्न विचारला. तसंच दळणवळणासाठी लोकल, बस, मेट्रोचे असे इतर पर्याय आहेत, असंही दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं. हा वाद कोर्टातला असून मी काय करु, असं म्हणत त्यांनी अखेर काढता पाय घेतला. पण विद्या चव्हाण यांनी सरकार काय करतंय हा पाढा कायम ठेवला.
सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे ३० हजार ओला, उबर टॅक्सीचालक-मालक आजपासून पुन्हा संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे.
दरम्यान, ओला-उबेर चालकांचा भारतमाता ते विधानभवन मोर्चा पोलिसांनी गुंडाळला आहे. भारतमाता ते विधानभवन मोर्चा नेण्यास मनाई केली आणि आंदोलकांना पोलीस व्हॅनमधून आझाद मैदानात नेलं.
ओला-उबेर चालकांच्या मागण्या
– मिनी, मायक्रो, गो प्रती किलोमीटर १२ रुपये, बेस फेअर ५० रुपये, वेटिंग टाईम २ रुपये मिळावा
– प्राईम, सिडान प्रती किलोमीटर १५ रुपये, बेस फेअर ७५ रुपये, वेटिंग टाईम ३ रुपये मिळावा
– xuv, xl, प्रती किलोमीटर १९ रु, बेस फेअर १०० रु, वेटिंग टाईम ४ रुपये मिळावा
– शेअर, पूल, मायक्रो, या सर्व बुकिंग मिनी आणि गोचा हिशेब (प्रती किलोमीटर १२ रुपये, बेस फेअर ५० रुपये, वेटिंग टाईम २ रुपये) हा मिळावा
–  रेंटल, हायर प्रती तासाला २५०रु व १० किलोमीटर हा मिळावा
– आऊटसाईड बुकिंग १५० किलोमीटरला २००० रु १५० वरील किलोमीटर मिनी, गो १२ रु. प्राईम, सिडान १५ रु. Xuv, xl १९ किलोमीटर ने धावेल
– दोन (२)किलोमीटर वरील पिकअप फेअर मधे ऐड झाला पाहीजे. त्यामुळे बुकीग कॅन्सल होनार नाही. कंपनीचा व गाडी मालकाचा फायदा होईल
– गाडी पिकअप करण्यासाठी ५०० मिटर जरी गेली व पिकअप आल्यावर ५ मिनिटा नंतर बुकीग कॅन्सल झाली तर कॅन्सल फी बेस फेअर च्या स्वरुपात मिळावी
– कंपनीने आपले कमिशन १५%+टॅक्स हा कट करावा