Coronavirus : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करावी : आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या प्रमुखांसोबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी स्वतःची व कुटुंबियांची काळजी घेऊन आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सजग राहून काम करावे.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी समन्वय साधून काम करावे. कॉरंटाईन केलेल्या व्यक्तींना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याची खात्री करा. कॉरंटाईन होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होत गेल्यास, त्यानुसार वसतिगृहे, आवश्यक तेवढे हॉटेल्स तयार ठेवावीत. वृद्धाश्रम व ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असणाऱ्या सोसायटींमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठीच्या सर्व उपाययोजना राबवा. मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनांनुसार ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी. परंतु प्रतिबंधात्मक कामे प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक त्याठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल.

नागरिकांनी काय करावे अथवा काय करु नये, याबाबत प्रशासनाच्या वतीने सर्वांना अवगत करण्यात येत असून जनजागृती साठी फेसबुक, ट्विटर यासारख्या समाजमाध्यमांवर भर द्यावा. परिस्थितीजन्य निर्णय घेण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही करुन प्रशासनाला वेळोवेळी अवगत करावे. कोणत्याही कामात हलगर्जीपणा करु नका, अशा सूचना त्यांनी दिल्या.

संशयितांची माहिती घेवून त्याबाबतचे निर्णय गतीने घ्यावेत. या काळात वैद्यकीय विभागाला सहकार्य करा. वैद्यकीय साधनसामग्री, अन्नधान्य पुरेसे शिल्लक असल्याची खात्री करा. लग्नसमारंभ व इतर समारंभ अत्यंत कमी व्यक्तींमध्ये संपन्न होतील, यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. रहिवासी सोसायट्यांमध्ये, सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणांनी मिशनमोडमध्ये काम करणे गरजेचे आहे. कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली असून त्यानुसार दिलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात.

बैठकीत उपायुक्त संजयसिंह चव्हाण, प्रताप जाधव, नयना बोंदार्डे, जयंत पिंपळकर, राजाराम झेंडे, साधना सावरकर, एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल व संजीव देशमुख, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी व विभाग प्रमुखांनी सोपविण्यात आलेल्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.