डॉक्टर, वॉर्डबॉय करीत होते ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार ! डॉ. लोकेश शाहुसह 3 वॉर्ड बॉय 15 इंजेक्शनसह ताब्यात, महाराष्ट्रात प्रचंड खळबळ

नागपूर : आपत्तीत सापडलेल्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करणार्‍यांना, भष्ट्राचार्‍यांना नेहमीच ‘मृताच्या टाळूवरील लोणी खाणारे’ ही म्हण वापरुन टिका केली जाते. मात्र, नागपूरमधील डॉक्टर आणि वॉर्डबॉयने प्रत्यक्षात ही म्हण खरी करुन दाखविली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट नागपूर पोलिसांनी उघडकीस आणले. त्यांच्या चौकशीतून डॉक्टर आणि वॉर्ड बॉयचा हा कारनामा समोर आला आहे.

पोलीस उपायुक्त निलोत्पल व त्यांच्या सहकार्‍यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍यांशी बनावट ग्राहकामार्फत संपर्क साधला. या ग्राहकाला रेमडेसिवीर विकणारा डॉ. लोकेश शाहु (आशा हॉस्पिटल, कामठी), वॉर्ड बॉय शुभम मोहदुरे, कुणाल कोहळे(स्वस्थम हॉस्पिटल, वर्धा रोड) आणि सुमित बागडे(दत्ता मेघे हॉस्पिटल, वानाडोंगरी) या चौघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १५ इंजेक्शन जप्त केले.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त निलोत्पल यांनी स्वत: याची चौकशी हातात घेतली. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

ही इंजेक्शन कोठून मिळविली याची चौकशी त्यांच्याकडे केली. हे डॉक्टर व वॉर्डबॉय हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन मागवित असत. मात्र, त्यातील काही गंभीर रुग्णांना इंजेक्शनचा सर्व कोर्स देण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु व्हायचा. त्यांच्याजवळचे इंजेक्शन लंपास करायचे व ते बाहेर काळाबाजारात विकत असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार ऐकल्यावर पोलीसही हादरुन गेले.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या या रॅकेटचे धागेदोरे हे अन्य जिल्ह्यांमध्येही जुळल्याचे तपासादरम्यान आढळून आले आहे.