अंबरनाथ : लसीचे दोन्ही डोस घेऊनही महिला डॉक्टर पुन्हा कोरोनाबाधित

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन  –  येथील कोरोना लसीकरणाला सुरुवात करताना ज्या डॉक्टरला लस देण्यात आली होती. त्या डॉक्टरला दोन डोस घेऊनही पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शुभांगी वाडेकर असे या डॉक्टरचे नाव आहे.

कोरोनाच्या लढाईत फ्रंट लाईन मध्ये काम करणाऱयांना सुरुवातीला कोरोना लस देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार अंबरनाथ येथे लसीकरणाला सुरुवात करताना अंबरनाथ व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी वाडेकर यांना पहिली लस घेण्याचा मान देण्यात आला होता. डॉक्टर शुभांगी यांना ही लस देत मोठ्या उत्साहात लसीकरणाचा शुभारंभ केला. ही लस घेतल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरी लास देखील त्यांनी घेतली. लस घेऊन ५० दिवस उलटल्यानंतर डॉ. वाडेकर स्वतःला सुरक्षित समजत होत्या. मात्र त्यांची कोरोना टेस्ट बाधित म्हणून आली आहे. या घटनेमुळे लस घेतल्यामुळे कोरोनाची लागण होऊ शकत नाही अशी प्रत्येकाची समजूत होती तो फोल ठरली आहे. डॉ वाडेकर यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यानी टेस्ट केली होती. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचार देखील सुरू केले आहेत. दरम्यान या घटनेमुळे लोकांच्या मनात लसीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारकडून लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. मात्र लस घेतल्यानंतरही कोरोना होणार नाही याची हमी आता कोणीही देऊ शकत नाही.