काय सांगता ! होय, आरोग्य केंद्रातील डॉक्टर ‘गायब’, चक्क ‘नर्स’ नं केली 168 ‘बाळंतपणं’

पोलादपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्यानं आरोग्य केंद्रातील नर्स आर आर नाईक यांनी जुलै 2017 पासून आजतागायत 168 महिलांची बाळंतपणं केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत पोलादपूर तालुक्यातील पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा प्रकार आहे. या आरोग्य केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळं नर्स नाईक आणि राऊतबाई याच तेथील काम पहात आहेत.

नम्रता विनोद कदम या महिलेला प्रसुतीसाठी सोमवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास पती विनोद कदम आणि सासु-सासऱ्यांनी पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केलं. नम्रता यांचं हे पहिलंच बाळंतपण होतं. पोलादपूर तालुक्यातील बोरावळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चाळीचा कोंड येथील ते रहिवासी आहेत. त्यांची पहिली प्रसुती सुखरुप होते की, नाही याबाबत कदम कुटुंबियांना चिंता वाटू लागली. कारण या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोपान वालपकर हे शनिवारी साप्ताहिक सुट्टीवर गेले होते जे परतले नव्हते.

नंतर कदम कुटुंबियांना माहिती मिळाली की, नाईक आणि राऊतबाई यांनी आजवर अनेक महिलांची सुखरुप प्रसुती केली आहे. नाईक नर्सही शुक्रवारी सायंकाळी साप्ताहिक सुट्टीवर होत्या. त्या आलिबाग तालुक्यातील त्यांच्या गावी होत्या. परंतु सोमवारी हजर राहण्याच्या हिशोबाने त्या रविवारीच रात्री परतल्या. नाईक नर्स आणि राऊतबाईंनी मिळून नम्रता कदम यांची सुखरूप प्रसुती केली. दोघींनी मिळून आजपर्यंत सुमारे 168 बाळंतपणं केल्याची माहिती समोर आली आहे.

Visit : Policenama.com