राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतील राममंदिराच्या बांधकामासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देणगी गोळा करण्याच्या देशव्यापी मोहिमेला शुक्रवारपासून (दि.15) प्रारंभ झाला आहे. त्यापोटी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 5 लाख रुपयांहून अधिक रक्कम देणगी म्हणून दिल्याचे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार यांनी सांगितले. तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कुटुंबीयांकडून यापूर्वीच 5 लाखांहून अधिक रक्कम देणगी म्हणून दिली आहे.

त्यापूर्वी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत वाल्मीकी मंदिरात पूजा केली. राय बरेलीच्या बैसवारा जिल्ल्यातील तेजगावचे माजी आमदार सुरेंद्र बहादूर सिंह यांनी सर्वाधिक म्हणजे 1 कोटी, 11 लाख, 11 हजार 111 रुपयांच्या देणगीचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्यातर्फे आणि आपल्या कुटुंबीयाच्या वतीने 5 लाख 100 रुपयांची देणगी दिली आहे. तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांनी यापूर्वीच 5 लाख,11 हजार रुपयांची देणगी दिली आहे. अनेक राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनीही देणग्या दिल्याचे वृत्त आहे.