‘सायकल मार्गा’च्या नावाखाली उधळपट्टी, सायकल मार्गांचे नियोजन नकोच नको’

पुणे : अशक्य गोष्टी शक्य करण्याच्या हट्टापायी पुणेकरांनी भरलेल्या कररुपी पैशाची उधळपट्टी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी थांबवावी, असा सल्ला सूज्ञ पुणेकरांनी दिला आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत विकासाच्या झेपावणाऱ्या पुणे शहरात आता रस्त्याची दाणादाण उडाली आहे. सायकल ट्रॅक आणि सायकल तर नकोच नको. रस्ते रुंदीकरण, पदपथ, सायकलट्रॅक करण्यासाठी कागदी घोडे नाचवून समाजाला दिशाभूल करीत पैशांची वारेमाप उधळपट्टी करण्यात समाधान मानणाऱ्यांनी आता तरी शहाणे व्हावे, अशी माफक अपेक्षा सामान्यजनांकडून केली जात आहे.

स्वारगेट-खडकवासला या मार्गावर सायकल मार्ग अस्तित्वात येण्याची शक्यता नसताना या मार्गावर सायकल मार्ग विकसित करण्यासाठी पावणेदोन कोटींची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेने शहरातील पाच अरुंद रस्त्यांवरही सायकल मार्ग विकसित करण्याचा घाट घातला आहे. शास्त्री रस्ता, शंकरशेट रस्त्यासह उपनगरातील अरुंद रस्त्यांवर सायकल मार्ग विकसित करण्यासाठीची निविदा प्रक्रिया महापालिकेच्या पथ विभागाकडून राबविली आहे. या रस्त्यावरील अपुरी जागा लक्षात घेता सायकल मार्ग विकसित करणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे. मात्र, या निमित्ताने सायकल मार्गाच्या नावाखाली महापालिकेची उधळपट्टी कायम असल्याचे दिसून येत आहे. सायकल योजना गुंडाळली असताना मार्ग कशासाठी कशासाठी आणि कोणासाठी केला जाणार आहे. तो वापरात येईल का, असे एक ना अनेक प्रश्न सामान्यजनांकडून उपस्थित क ले जात आहेत.

कर्वेनगर येथील वनदेवी मंदिर ते वांजळे चौक, पौड फाटा ते चांदणी चौक, लालबहादूर शास्त्री रस्ता ते दांडेकर पुलापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत आणि शंकरशेट रस्त्यावर सायकल मार्ग विकसित करण्याची कामे येत्या काही दिवसांत करण्यात येणार आहेत. शहरातील भाडेतत्त्वावरील सायकल योजना गुंडाळली गेली असतानाही सायकल मार्ग विकसित करण्याचा महापालिकेचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. आता तलवारीने लढण्याची वेळ नाही, संगणकाची आणि विचारांची लढाई आहे, याचे भान तरी प्रशासनाने ठेवले पाहिजे. कोरोनामुळे सामान्यांचे रोजगार गेले आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन काही इंडस्ट्री उभी करता आली तर पाहावी, त्यातून समाजहित साधता येईल. मात्र, नवी इंडस्ट्री उभी करण्यात राज्यकर्ते आणि प्रशासनाला कुठे स्वारस्य आहे. त्यांनी तर कंबरेचे काढून डोक्याला गुंडाळले नाही, तर काढूनच टाकले आहे.

वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिके ने सायकल वापर करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत महापालिकेने सायकल एकात्मिक विकास आराखडा केला आहे. हा आराखडा कागदावरच आहे. तो कागदावरच राहणार प्रत्यक्षात उतरणार नाही, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. त्यातच स्मार्ट सिटी आणि महापालिके च्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेली भाडेतत्त्वावरील सायकल योजनाही गुंडाळली गेली आहे. मात्र, केवळ अंदाजपत्रकात सायकल मार्ग विकसित करण्यासाठी तरतूद असल्यामुळे शहरात नव्याने सायकल मार्ग विकसित करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे.

दांडेकर पूल, लाल बहादूर शास्त्री रस्ता येथे सायकल मार्ग विकसित करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याची वस्तुस्थिती आहे. हेच चित्र शंकरशेट रस्त्याबाबतचे आहे. या रस्त्यावर उड्डाण पूल आहे. दांडेकर पूल, लालबहादूर शास्त्री रस्ता मुळातच वाहतुकीसाठी अपुरा ठरत आहे. या परिस्थितीत सायकल मार्ग कसे विकसित होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र के वळ उधळपट्टीसाठीच महाालिके चा हा खटाटोप सुरू असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट होत आहे. शहरातील सायकल मार्गांची दुरवस्था आहे. ज्या ठिकाणी सायकल मार्ग आहेत, तेथे त्यांचा अपेक्षित वापर होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक सायकल मार्गांमध्ये सलगता नसून बहुतांश सायकल मार्गांवर विविध प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. गेल्या चार वर्षांत महापालिके ला जमेतेम २४ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग विकसित करता आले आहेत. सातारा रस्ता, जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, कर्वेनगर रस्ता, कोथरूड या भागातील सायकल मार्गांचा वापर होत नसल्याचेही वेळोवेळी पुढे आले आहे. त्यानंतरही सायकल मार्ग उभारणीचा घाट महापालिकेने घातला आहे.

कागदी घोडे थांबवा

महापालिकेचे चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. सध्या महापालिकेचे उत्पन्न वाढत आहे. त्यामुळे उधळपट्टीही सुरू झाली आहे. सायकल मार्ग विकसित करणे, काँक्रिटीकरण, सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती, पदपथांचे विकसन अशा कामांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरुवात झाली आहे. सायकल योजना बंद पडली आहे. तरीसुद्धा आपण काही तरी नवीन करतो आहोत, हे दाखविण्यासाठी सायकल मार्गांचे विकसनाची प्रक्रिया सुरू केली आहे. हा उपक्रम कागदावर छान दिसतो, प्रत्यक्षात त्याच्या अडचणींचा कोणी पाढा वाचला नाही. त्यामुळे ही योजना फक्त कागदावरच राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कागदी घोडे नाचविणे थांबविले, तर जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबण्यास मदत होईल. कोरोना संसर्गामुळे कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा आणि अनावश्यक उधळपट्टीची कामे थांबवावी, हा महापालिका आयुक्तांचा आदेशही कागदावरच राहिला आहे.