Mumbai : Night curfew साठी आम्हाला प्रवृत्त करू नका, BMC पालिका आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ख्रिसमस आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी एकत्र येऊन केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर महापालिकेची करडी नजर आहे. याच पार्श्वभूमीवर सांताक्रुझ, लोअर परळ, दादर, तसेच वांद्रे परिसरातील पब आणि हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला असून 560 जणांकडून 43 हजार रुपये दंड आकरले आहे. त्यामुळे पालिकेला रात्रीच्या वेळी संचारबंदी (कर्फ्यू) लावण्यास प्रवृत्त करू नका, असे आवाहन पालिका आयुक्त इकबालसिंग चहल (BMC commissioner Iqbal Singh Chahal) यांनी मुंबईकरांना सोमवारी (दि. 14) केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांताक्रुझमधील बॉम्बे अड्डा या पबमध्ये धाड टाकली. यावेळी 275 व्यक्तींनी मास्क घातले नव्हते. त्यानुसार, पालिकेने त्यांना 30 हजारांचा दंड ठोठावला आहे. दादरच्या प्रीतम हॉटेलमध्येही 120 जणांवर आणि रुड लॉजवरही अशीच कारवाई केली. लोअर परळ, वांद्रे परिसरातही मास्क न घालणाऱ्या, तसेच फिजिकल डिस्टन्सचे नियम न पाळणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करत 560 जणांकडून पालिकेने दंडाच्या स्वरूपात 43 हजार 200 रुपये वसूल केले आहेत.

कोरोना संपलेला नाही, बेशिस्तपणे वागू नका
कोरोना अजूनही संपलेला नाही, याचे भान मुंबईकरांनी ठेवावे आणि गर्दी न करणे, मास्क लावणे हे नियम पाळावे, अशी विनंती चहल यांनी केली. आम्ही रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या विरोधात आहोत. त्यामुळे बेशिस्तपणे वागून आम्हाला ती लागू करण्यास प्रवृत्त करू नका, अशा भाषेत त्यांनी नागरिकांना समजही दिली.