अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी इतर डॉक्टरांसोबत काम करू नये; ‘एमएमसी’ने काढले परिपत्रक

नागपूर : केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिल्याने आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्यातच आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) एक परिपत्रक काढलं असून त्यामध्ये अ‍ॅलोपॅथी (मॉडर्न मेडिसीन) शाखेतील डॉक्टरांनी इतर पॅथीच्या डॉक्टरांसोबत सेवा देऊ नये. इतर पॅथीसोबत काम करणे हे नीतिमत्तेला धरून नाही, असे मत मांडले आहे. तसेच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीच्या डॉक्टरांसोबत काम न करण्याचे आवाहनही ‘एमएमसी’ने केले आहे. दरम्यान ‘एमएमसी’च्या पत्रामुळे वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्रसरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) निदर्शने करून एक दिवसाच्या संपाचे हत्यारही उपसले. तर ‘नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन’च्या (निमा) सदस्यांनी त्या दिवशी गुलाबी रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. परंतु हा वाद आता इतक्यावर थांबताना दिसून येत नाही.

एमएमसी’ने इंडियन मेडिकल कौन्सिल रेग्युलेशन-२००२ चा दाखला देत अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अ‍ॅक्ट १९६५ ची आठवण देताना इतर पॅथीसोबत काम करणे अन्य डॉक्टरांना प्राप्त कायदेशीर अधिकारावर घाला घालणारे आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाशी संलग्न नसणाऱ्या डॉक्टरांना मॉडर्न मेडिसीनची प्रॅक्टिस करता येणार नाही. यासोबतच अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी प्रॅक्टिस करताना इतर पॅथीसोबत काम करू नये, असेही ‘ स्पष्ट केले आहे.

पत्रच नीतिमत्तेला धरून नाही
निमाचे राज्य संघटक डॉ. मोहन येंडे म्हणाले की, राज्याची किंवा देशाची आरोग्याची स्थिती पाहता इतर पॅथीसोबतच अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी सेवा देऊ नये, असे म्हणणे अयोग्य आहे. शासनाच्या अनेक रुग्णालयात एमबीबीएस, बीएएमएस व बीएचएमएस डॉक्टर सोबत रुग्णसेवा देतात. यामुळे एमएमसीने काढलेले परिपत्रकच नीतिमत्तेला धरून नाही.