डॉ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन
मुंबई विद्यापीठाला तब्बल सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर नवे कुलगुरू मिळाले आहेत. माटुंग्यातील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली आहे, डॉ पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरुन गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी डॉ. संजय देशमुख यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तेव्हापासून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपाल विद्यासागर राव यांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नेमली होती. डॉ श्यामलाल सोनी (संचालक, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, पौडी गढवाल, उत्तराखंड) व भूषण गगराणी (उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको) यांचा देखील समितीमध्ये समावेश होता.