‘DRDO’ मुळे शस्त्रास्त्रात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्स्थेने (डीआरडीओ) विविध लष्करी तंत्रज्ञान विकसीत करून संरक्षण क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविले आहे. यामुळे आगामी काळात शस्त्रास्त्रांचे परकीय अवलंबत्व कमी होऊन देश पूर्णपणे आत्मनिर्भर होईल, असा विश्वास लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केला आहे. डीआरडीओच्या एआरडीई, आर अँन्ड डी, तसेच एचईएमआरएलने अनेक महत्वाची लष्करी उपकरणे बनवली असून ही उपकरणे भारतीय सैनिक वापरत आहेत. भविष्यात नव्या युगातील आधुनिक शस्त्रप्रणालीचा या संस्था विकसीत करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. .

लष्करप्रमुख जनरल नरवणे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. त्यांनी शुक्रवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या पुण्यातील तीन प्रयोग शाळांना भेट दिली.. यावेळी त्यांनी विविध लष्करी प्रकल्पांचा आढावा घेतला. एआरडीईमध्ये तयार होत असलेली एटीएजीएस प्रणाली, कृत्रीम पुल, लेझर गायडेड क्षेपणास्त्र प्रणाली, पिनाका रॉकेट लॉन्चर आदींची जनरल नरवणे यांनी माहिती घेतली.

तसेच भारत फोर्ज येथे भेट देत ऐरोस्पेस मैनुफैक्चरिंग कारखाना, अल्ट्रा-लाइट हॉवित्जर, संरक्षण वाहो, छोटी शस्त्रास्त्रे इत्यादी लष्करी योजनांचा आढावा घेतला. कल्याणी सेंटर ऑफ टेक्निकल एण्ड मैनुफैंक्चरिंग इनोवेशन प्रकल्पाचीही नरवणे यांनी पाहणी केली. या ठिकाणी त्यांनी थ्रीडी प्रिंटींग, स्वयंचलीत वाहने तसेच नॅनो तंत्रज्ञान आणि थर्मल इमेजिंग बद्दल माहिती जनरल नरवणे यांनी घेतली.