झिंगलेल्या महाभाग पोलिसाचा चौकीतच राडा ; मुख्यमंत्र्यांसह नितीन गडकरींना शिव्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दारू पिऊन झिंगलेल्या एका महाभाग पोलिस कर्मचार्‍याने चक्‍क पोलिस चौकीतच राडा घातल्याचा धक्‍कादायक प्रकार नागपूर येथील कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. झिंगलेल्या पोलिस कर्मचार्‍याच्या या कृत्यामुळे राज्य पोलिस दलात खळबळ उडाली आहे. राडा घालुन न थांबता महाभाग पोलिस कर्मचार्‍याने चक्‍क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे पोलिस महासंचालक आणि जिल्हा पोलिस अधिक्षक या सर्वांच्या नावाने शिव्या घातल्या आहेत. दरम्यान, झिंगलेल्या या महाभाग पोलिसावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाचगाव हे गाव आदर्श गाव योजनेसाठी दत्‍त घेतलेले आहे. त्याच गावातील पोलिस चौकीत सर्वसामान्य नागरिकांना झिंगलेल्या पोलिसांकडून शिव्या दिल्या जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दि. 24 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री गावात भांडणे झाली होती. त्याबाबतची तक्रार करण्यासाठी काहीजण पाचगाव पोलिस चौकीत गेले होते. पण, चौकीत हजर असलेल्या पोलिस कर्मचारी प्रदीप मने याने तक्रार नोंद करण्यास स्पष्ट नकार देत संबंधितांना शिवीगाळ केली. झिंगलेल्या अवस्थेत असलेल्या पोलिस कर्मचार्‍याची ही वागणुक पाहून युवकांनी त्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये सुरू केले. त्यामुळे झिंगलेला पोलिस कर्मचारी आणखीनच भडकला. त्याने सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. एवढयावरच तो थांबला नाही तर त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे पोलिस महासंचालक आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देखील शिव्या घातल्या आहेत. झिंगलेल्या कर्मचार्‍याचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर वायर झाला असून राज्य पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस चौकीतच सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारची वागणुक मिळत असल्याचे पहावयास मिळाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस कर्मचारी प्रदिप मने याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी गावकर्‍यांकडून तसेच तक्रार देण्यास पोलिस चौकीत गेलेल्या युवकांकडून होत आहे.