मुलाच्या वरातीत डाॅल्बी (DJ) वाजवणे सावकाराला पडले महागात

किनवट : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – किनवट शहरातील एका व्यापाऱ्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत रात्री उशिरापर्यंत आपल्या मुलाच्या लग्नाची वरात मोठ्या आवाजामध्ये रस्त्याने डिजे वाजवत काढल्याने पोलीसांनी डिजे बंद करून उन्मत्त व्यापाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की किनवट शहरातील सावकारी व्यवसाय करणारे रत्नाकर कंचलवार या व्यापाऱ्याच्या मुलाचे लग्न १४ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय शेजारील मंगलकार्यालयात संपन्न झाले. रात्री विवाह सोहळा संपल्यानंतर उशिरा मा. सर्वोच्च न्यायाल्याने बंदी घातलेल्या डिजेच्या तालावर लग्नाची वरात काढण्यात आली. रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करत रस्त्या शेजारील नागरिकांची झोपमोड करत मोठ्या आवाजामध्ये डिजे वाजवत वरात जिजामाता चौकात पोहोचली.

जिजामाता चौकात आल्यानंतरही आवाज कमी करण्यात आला नाही. जिजामाता चौकापासून किनवटच्या न्यायाधिशाचे घर व न्यायालय व पोलीस स्थानकही जवळ असल्याचे भानही या उन्मत्त व्यापाऱ्याला नसल्याने किनवट पोलीसांनी त्यांना सदर चूक लक्षात आणून देऊन डिजे बंद करण्याकरिता सांगितले. परंतु पोलिसांना न जुमानल्याने शेवटी पोलिसांनी खाक्या दाखवत सदर डिजे पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. त्यावर सदर व्यापाऱ्याने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांशी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला.

समजावल्यानंतरही सदर ईसम ऐकत नसल्याने पोलीस स्टेशन किनवट मध्ये सदर व्यापाऱ्याविरुध्द 305/18 कलम 188,290,291 उपकलम 134,131,135,34 भादंवी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी कायद्याचे पालन करत कर्तव्यदक्षता दाखवल्याने किनवट शहरात पोलीसांचे कौतुक होत असुन पोलीसांच्या कृतीबद्दल अनेक गौरवोद्गार ऐकावयास मिळत आहे.