EPFO : पीएफ खात्यावर मिळणार ‘हे’ 5 फायदे, तुमची वृद्धावस्था होते सुरक्षित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणार्‍यांना भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) पैशांचा उपयोग खूप होतो. ही केवळ त्यांची बचतच नाही, तर निवृत्तीसाठी भांडवलही आहे. देशातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था सर्व कर्मचार्‍यांना पीएफ सुविधा प्रदान करते. यासाठी कर्मचार्‍याच्या पगाराचा एक छोटासा भाग पीएफ खात्यात जमा करण्यासाठी वजा केला जातो. दरम्यान, पीएफ खात्याशी संबंधित इतर बरेच फायदे आहेत, जे पीएफ खातेदारांना उपलब्ध आहेत. जाणून घेऊया ईपीएफशी संबंधित बरेच फायदे, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते.

विनामूल्य विम्याचा लाभ
नोकरी मिळाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीसाठी पीएफ खाते उघडले जाते. कर्मचार्‍यांचे पीएफ खाते उघडताच, त्याला डिफॉल्ट विमादेखील मिळतो. एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (ईडीएलआय) अंतर्गत कर्मचार्‍याचा सहा लाख रुपयांपर्यंत विमा उतरविला जातो. सेवा कालावधीत त्याचा मृत्यू झाल्यावर ईपीएफओच्या सक्रिय सदस्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला किंवा कायदेशीर वारसांना सहा लाखांपर्यंत पैसे दिले जातात. हे फायदे कंपन्या आणि केंद्र सरकार त्यांच्या कर्मचार्‍यांना पुरवित आहेत.

80 सीअंतर्गत आयकरात सूट
ईपीएफ हा कामगार वर्गासाठी कर वाचविण्याचा एक चांगला मार्ग आहे. आयकर कलम 80 सीअंतर्गत ईपीएफमध्ये जमा केलेल्या 1.5 लाख रुपयांवर आयकर सूट मिळू शकते. ईपीएफ खातेदार त्यांच्या पगारावर 12 टक्क्यांपर्यंत कर वाचवू शकतात. मात्र, नवीन कर कायद्यात हा लाभ बंद केला गेला आहे, जुनी कर प्रणाली निवडून आपण अद्याप या फायद्याचा लाभ घेऊ शकता.

निवृत्तीनंतर निवृत्तिवेतन
ईपीएफओ कायद्यांतर्गत, कर्मचार्‍याच्या मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता (डीए) मधील 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. त्याचप्रमाणे कंपन्या मूलभूत पगाराचा 12 टक्के आणि डीए पीएफ खात्यात जमा करतात, त्यातील 3.67 टक्के कर्मचार्‍यांच्या खात्यात जातात तर उर्वरित 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत जमा होतात. यामध्ये कमीत कमी 10 वर्षे काम केलेला पगारदार वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्तीनंतर निवृत्तिवेतनास पात्र आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचार्‍यांना पेन्शन मिळते.

गरजेनुसार पैसे काढण्याची सुविधा
पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम संकटाच्या वेळी खूप उपयुक्त आहे. पीएफ कायद्यांतर्गत कर्मचारी आवश्यक असल्याच काही रक्कम काढू शकतात. पीएफ कायद्यानुसार घर विकत घेण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी, घराचे कर्ज परतफेड करण्यासाठी, आजारपणात, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी पैसे काढले जाऊ शकतात. दरम्यान, या सुविधांचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांना विशिष्ट कालावधीसाठी ईपीएफओचे सदस्य असणे आवश्यक आहे.

निष्क्रीय खात्यावर व्याज
ईपीएएफओचा सर्वांत चांगला भाग म्हणजे कर्मचार्‍यांच्या निष्क्रीय पीएफ खात्यावरही व्याज दिले जाते. 2016 मधील कायद्यातील बदलानुसार आता पीएफ खातेधारकांना त्यांच्या पीएफ खात्यात तीन वर्षांहून अधिक कालावधीत सुप्त पडून असलेल्या रकमेवरही व्याज दिले जाते. पूर्वी तीन वर्षे सुप्त असलेल्या पीएफ खात्यावर व्याज देण्याची कोणतीही तरतूद नव्हती.