‘अत्यावश्यक वाहतुकीस पासची गरज नाही; पण….’ – पोलीस महासंचालक संजय पांडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. त्यानुसार, राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याबाबत राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होत असेल तर बळाचा, लाठीचा वापर होईल. जोपर्यंत नियमांचे उल्लंघन होत नाही, तोपर्यंत पोलिसांनी लाठीचा वापर करू नये’.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (मंगळवार) जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी राज्यात बुधवार रात्री 8 वाजल्यापासून कडक नियम लागू होणार असल्याचे सांगितले. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की जगभर पसरलेल्या कोरोना महामारीशी आपल्याला लढा द्यायचा आहे. हा लढा आपण तुमच्या सहकार्याने यशस्वी करूया. पोलिसही यासाठी सज्ज आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. आपण आपली स्वतःची काळजी घ्या. कलम 144 लागू होणार असून, 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमू शकत नाहीत. मात्र, नियम मोडले तर लाठीचा वापर केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, अत्यावश्यक वाहतुकीस पासची गरज नसणार आहे. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होत असेल तर बळाचा, लाठीचा वापर केला जाणार आहे. जर कोणी जाणूनबुजून नियमभंग केला नसेल तर त्याच्यावर विनाकारण बळाचा वापर करू नये असे सांगतानाच ते म्हणाले, पण जाणूनबुजून नियमांचा भंग केला तर लाठीचा वापर केला जाईल. तसेच नागरिकांना काही नियम जाणून घ्यावयाचे असल्यास ते स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून माहिती करून घेऊ शकता, असेही पांडे म्हणाले.