आजम खान यांनी माझ्यावर ॲसिड हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न केला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – समाजवादी पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते आजम खान यांच्‍या विरुद्ध लखनऊमधील हजरतगंज पोलिस ठाण्यात मानहानीप्रकरणी एफआयआर नोंद झाली असताना आता प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांनी देखील आजम खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आजम खान यांनी आपल्‍यावर ॲसिड हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न केला होता, असा गंभीर आरोप जयाप्रदा यांनी केला आहे. त्यामुळे आता आजम खान यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एका लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये बोलताना जया प्रदा यांनी हा आरोप केला आहे.

यावेळी बोलताना, जयाप्रदा म्‍हणाल्‍या, ‘ज्‍यावेळी मी एक महिला म्‍हणून आजम खान यांच्‍यासोबत निवडणूक लढवत होते, त्‍यावेळी माझ्‍यावर ॲसिड हल्‍ला झाला. माझ्‍या जीवाला धोका होता. त्‍यावेळी माझे समर्थन करण्‍यासाठी कुठलाही नेता समोर आला नाही. मुलायम सिंह यांनी एकदाही मला फोन केला नाही.’ याबाबत खेद जया प्रदा यांनी व्यक्त केला. जयाप्रदा यांनी अमर सिंह यांच्‍यासोबत राष्ट्रीय लोक मंचची स्‍थापना केली होती.

‘माझे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल करण्‍यात येत होते. मी अनेकवेळा आत्‍महत्‍येचा विचार केला. मी डिप्रेशनमध्‍ये होते. अमर सिंह डायलिसिसवर होते. त्‍याचवेळी हे सर्व घडत होते. मी रडत होते. त्‍यावेळी कुणीही माझे समर्थन केले नाही. डायलिसिस पूर्ण झाल्‍यानंतर अमर सिंह परतले. त्‍यांनी माझे समर्थन केले. तुम्‍ही त्‍यांच्‍याबद्‍दल काय विचार करता? गॉडफादर वा आणखी कोण? जरी मी त्‍यांना राखीदेखील बांधली तर लोक बोलायचे थांबणार नाहीत. लोक काय म्‍हणतात, याची मला पर्वा नाही. पुरूष प्रधान व्यवस्थेत एखादी महिला नेता बनणे खरेच आव्‍हानात्‍मक आहे,’ असेही त्‍या म्‍हणाल्‍या. ‘सपाचे वरिष्‍ठ नेते आजम खान यांनी मला त्रास दिला. माझ्‍यावर ॲसिड हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न केला,’ असा गंभीर आरोप जया यांनी केला.

‘मणिकर्णिका चित्रपटात जे काही दाखवण्‍यात येत आहे, त्‍यासारखा मी अनुभव घेत आहे. एक महिला दुर्गाचा अवतारदेखील घेऊ शकते, असेही जया यांनी नमूद केले.