कोरोना संकटातही ‘या’ सेक्टरमधील कर्मचार्‍यांना मोठा दिलासा, पगारात झाली भरघोस वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अवघा देश गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी, वेतन कपात सुरु केले आहे. कर्मचा-यांचे प्रमोशन, पगारवाढ देखील थांबवली आहे. मात्र असे असतानाही आयटी क्षेत्रातील कर्मचा-यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना संकटात देखील आयटी कर्मचा-यांच्या पगारात घसघसीत वाढ झाली आहे. एक्सेंचर इंडिया, टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस आदी कंपन्यांनी कर्मचा-यांच्या पगारात दुप्पटीने वाढ केली आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तसेच मार्केटमधील पत टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे.

1) एक्सेंचर इंडिया

एक्सेंचर इंडिया कंपनीने गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, बोनस आणि प्रमोशन दिले होते. यंदा फेब्रुवारीमध्ये वाढ आणि पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यंदा एप्रिलमध्ये त्यांच्या कर्मचार्‍यांना थँक यू बोनस मिळाला आहे. कंपनीने 605 कर्मचार्‍यांना व्यवस्थापकीय संचालक (MD) पदावर पदोन्नती दिली आहे. त्यातील 63 पदांवर वरिष्ठ एमडी पदावर पदोन्नती झाली आहे. या कंपनीत 2 लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात.

2) टीसीएस

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 6 महिन्यांच्या कालावधीत कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये दोनदा वाढ केली आहे. कंपनीने एप्रिल 2021 पासून आपल्या सर्व कर्मचार्‍यांना सुधारित वेतन देणे सुरू केले.

3) इन्फोसिस

देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसने कर्मचाऱ्यांच्या भरपाईची समीक्षा दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती दिली. कंपनीने जानेवारी 2021 पासून आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ केली. गेल्या वर्षी कंपनीने आपल्या बर्‍याच कर्मचाऱ्यांची वाढ थांबवली होती.

4) टेक महिंद्रा

आयटी क्षेत्रातील कंपनी टेक महिंद्राने कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2021 पासून अंमलात आली असून कंपनीने आपल्या हुशार कर्मचाऱ्यांना रिटेंशन बोनस देखील जाहीर केला आहे.