Covid च्या उपचारात रेमडेसिव्हिर नेमकं किती प्रभावी? पुण्याच्या महिला शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   देशभरात कोरोना व्हायरसचे संकट आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर केला जात आहे. मात्र, हे इंजेक्शन नेमके किती प्रभावी आहे, याचा अभ्यास पुण्याच्या एका महिला शास्त्रज्ञाने केला आहे.

कोरोना व्हायरस प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसावर हल्ला करत आहे. त्यामुळे रक्तात ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या पेशी कमकुवत होतात. ऑक्सिजन पातळी घटते आणि त्यामध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र, यातील अनेक रुग्णांना डॉक्टरांकडून रेमडेसिव्हिर दिले जाते. पण हे इंजेक्शन कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याचे संशोधन नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या संशोधनात पुण्यातील महिला शास्त्रज्ञ डॉ. अपूर्वा मुळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

अमेरिकेतील लॉस एंजलिस शहरात ‘सिडर्स सायनाय मेडिकल सेंटर’मध्ये कार्यरत असलेल्या डॉ. अपूर्वा मुळे यांनी डॉ. बॅरी स्ट्रिप यांच्या सहकार्याने हे संशोधन केले आहे. ‘सेल रिपोर्ट्स’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत त्यांचे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. मुळे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून जैवतंत्रज्ञान विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे.