‘कोरोना’मुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा ढकलल्या पुढे !

मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या हिवाळी हंगाम 2020 च्या तिसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेचे दोन टप्पे सुरुळीत झाले. मात्र, कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हिवाळी 2020 हंगामातील परीक्षांचा पहिला टप्पा 4 जानेवारीपासून सुरू झाला होता, तर दुसरा टप्पा 8 मार्चपासून सुरू झाला आहे. त्यानुसार, अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा घेतल्या जात आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील पदवी; तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा 23 मार्चला घेण्यात येणार होत्या. मात्र, कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार, आता या परीक्षा 19 एप्रिलपासून घेतल्या जाणार असून, सुधारित वेळापत्रक आज (सोमवार) प्रसिद्ध केले जाणार आहे.

दरम्यान, प्रथम आणि द्वितीय वर्षातील परीक्षांमध्ये उन्हाळी 2020 परीक्षांच्या काही विद्याशाखांची निकाल प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आता या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुधारित वेळापत्रक लवकरच

राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यानंतर आता हिवाळी हंगाम 2020 च्या तिसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आज जाहीर होणार आहे.