खळबळजनक ! उस्मानाबाद कारागृहात कोरोनाचा विस्फोट, 131 कैदी बाधित, तुरुंग प्रशासन हादरले

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. दरम्यान उस्मानाबादच्या तुरुंगातही आता कोरोनाचा विस्फोट झाल्याचे समोर आले आहे. या तुरुंगात तब्बल 131 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 9 महिला कैद्यांचा समावेश आहे. एवढया मोठ्या संख्येने कैद्यांना लागण झाल्याने तुरुंग प्रशासन हादरून गेले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. उस्मानाबादसह, वाशी, परंडा या तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यात आता जिल्हा कारागृहात शनिवारी आणि रविवारी केलेल्या चाचण्यात 131 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तुरुंगात एकूण 250 कैदी असून त्यांच्यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व कैद्यांना लक्षण नसली तरी खबरदारी म्हणून त्यांना खाजानगर येथील कैद्यांच्या विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत काळजी घेतली जात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान जिल्ह्यात दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. याठिकाणी सध्या 5687 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. प्रामुख्यानं उस्मानाबाद शहर यासह कळंब, वाशी, परंडा हे जिल्ह्यातले कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 42 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून 1100 हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.