फेसबुक स्वतःची ‘क्रिप्टोकरन्सी’ बाजारात आणणार

सॅन फ्रान्सिस्को : वृत्तसंस्था – पाश्चात्य देशांत क्रिप्टोकरन्सीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुकही आता आपली स्वतःची ‘क्रिप्टोकरन्सी’ बाजारात आणणार आहे . फेसबुकसाठी स्वित्झर्लंडमधील लिब्रा नेटवर्क ही कंपनी पेमेंट व्यवस्थेसह ब्लॉकचेन यंत्रणा विकसित करणार आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

फेसबुकचे ‘ग्लोबल कॉइन’ नावाचे हे आभासी चलन २०२०च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये जगभरात जारी केले जाण्याची शक्यता आहे. हे आभासी चलन फेसबुकखेरीज अन्य ईकॉमर्स संकेतस्थळांवरील खरेदीसाठीही वापरता येईल. एवढेच नव्हे तर फेसबुकचीच मालकी असलेल्या व्हॉट्सॲपवरून एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही ‘ग्लोबलकॉइन’ उपयुक्त ठरेल. व्हॉट्सॲपवर डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा यापूर्वीच फेसबुकने केली आहे.

क्रिप्टोकरन्सीविषयी –

२००९ साली पहिल्या क्रिप्टोकरन्सीची (बिटकॉइन ) निर्मिती पासूनझाली तेव्हापासून त्याचा आभासी जगात प्रवास चालू आहे. लॉगइन आणि अत्यंत किचकट पण गुप्त अशा पासवर्डच्या आधारे क्रिप्टोकरन्सीचे सारे व्यवहार चालतात. त्यामुळे नेमकी कोणती व्यक्ती क्रिप्टोकरन्सी होल्डर आहे हे कळणे अवघड आहे.

क्रिप्टोकरन्सी होल्डर हा जगाच्या पाठीवरून कोठूनही व्यवहार करीत असला तरी त्याचा आयपी अ‍ॅड्रेस सोडला तर इतर कोणतीच माहिती मिळत नाही. अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे.

भारतामध्ये रिसर्व्ह बँकेने स्पष्ट केल्यानुसार , क्रिप्टोकरन्सी हे अधिकृत चलन नाही तसेच बँकेकडून क्रिप्टोकरन्सी व तत्सम आभासी चलनाच्या माध्यमातून केले जाणारे व्यवहार हे मध्यवर्ती बँकेने अथवा मॉनिटरी ऑथॉरिटीने प्रमाणित केलेले नाहीत. तसेच हे व्यवहार करण्यासाठी कोणतेही नियामक, पूर्वपरवानगी, नोंदणी अथवा प्रमाणीकरण नाही.