Facebook नं लाँच केलं TikTok चं क्लोन ! Instagram Reels नं बनतील दर्जेदार व्हिडीओ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : फेसबुकने टिकटॉकला टक्कर देण्यासाठी आपले नवीन फीचर इंस्टाग्राम रील्स लाँच केले आहे. तसे इंस्टाग्राम (Instagram) ने गेल्या महिन्यात भारतात त्याच्या ‘Reels’ या नवीन फीचरची चाचणी सुरू केली आहे. पण आता हे अधिकृतपणे लाँच करण्यात आले आहे. कंपनीने आता एकाच वेळी 50 देशांमध्ये हे लाँच करण्याची घोषणा केली आहे. ज्यात अमेरिका, भारत, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, यूके, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर देश समाविष्ट आहेत. इंस्टाग्रामने मागील वर्षी ब्राझीलमध्ये याच्या चाचणीस प्रारंभ केला होता आणि काही काळापूर्वी फ्रान्स आणि जर्मनीमध्ये त्याचा विस्तार केला गेला.

हे नवीन फीचर अशा वेळी आले आहे जेव्हा सध्याच्या काळात लोकप्रिय ठरलेले अ‍ॅप टिकटॉकला भारतानंतर अमेरिकेने देखील बंदी घालण्याची तयारी केली आहे. भारत सरकारने गुगल प्ले स्टोअर व अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमधून 59 चिनी अ‍ॅप्स काढून टाकले आहेत आणि भारतात त्यांच्यावर बंदी घातली आहे.

अशाप्रकारे कार्य करते इंस्टाग्राम रील्स

इंस्टाग्राम रील्सबद्दल चर्चा केली तर हे स्टँडअलोन अ‍ॅप नाही तर इन्स्टाग्रामचेच एक फीचर आहे. या अ‍ॅपद्वारे वापरकर्ते 15 सेकंदांची मल्टी-क्लिप तयार करू शकतात. या क्लिपमध्ये ऑडिओ, इफेक्ट्स आणि नवीन क्रिएटिव्ह टूल सहजपणे जोडली जाऊ शकतात. इंस्टाग्राम रील्सला वापरकर्ते फीड म्हणून पोस्ट करण्यास सक्षम असतील आणि एक स्टोरीसारखे शेअर देखील करू शकतात, जे 24 तासांत अदृश्य होईल. फेसबुकने म्हटले आहे की इन्स्टाग्राम रील्स फीडवर शेअर करू शकतात. रील्स अ‍ॅपने कोणीही इन्स्टाग्रामवर क्रिएटर बनू शकेल आणि नवीन ग्लोबल प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल.

इंस्टाग्राम रील्समध्ये ऑडिओ, एआर इफेक्ट्स, टाइमर आणि काउंटडाउन, अलाइन आणि स्पीड टूल्स प्रदान केले गेले आहेत. यांचा वापर करून शॉर्ट क्लिप्स एडिट करता येतील. इंस्टाग्राम याकडे क्रिएटर्स साठी एक संधी म्हणून पाहत आहे, जसे की टिकटॉकने केले होते. फरक इतकाच की इन्स्टाग्राम आधीपासूनच क्रिएटर्स बरोबर भागीदारीत आहे.