Fact Check : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी परीक्षा न देताच झाली IAS ?, जाणून घ्या सत्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला ही नुकतीच IAS परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून तिच्याबाबत एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच IAS म्हणून निवड झाल्याचा दावा या मेसेजमधून करण्यात आला आहे. UPSC च्या परीक्षेमध्ये ९० जणांना मागच्या दाराने प्रवेश देण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. असे दावे करणाऱ्या अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत.

सरकार आता गरीब आणि ग्रामीण भागातील मुलांना यूपीएससीमध्ये प्रवेश बंद करण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यावरून आता व्हायरल होत असलेल्या या पोस्ट खऱ्या आहेत. की, खोटे आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या दरम्यान, प्रख्यात वृत्तसंस्था असलेल्या एएफपीने व्हायरल होत असलेले हे मेसेज खरे आहेत कि खोटे हे तपासण्याचा प्रयत्न केला आहे. एएफपीने सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेची मेरिट लिस्ट शोधली. त्यामध्ये अंजली बिर्ला यांचे नाव आणि परीक्षा क्रमांक दिसून आले आहे. तसेच अंजली बिर्ला यांचे नाव UPSC च्या वेबसाइटवरसुद्धा आहे. त्यामुळे ओम बिर्ला यांच्या कन्येला IAS मध्ये मागच्या दाराने प्रवेश देण्यात आल्याचा करण्यात आलेला असा दावा खोटा ठरला आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला यांचे प्राथमिक शिक्षण कोटा येथे झाले. कोटा येथील सोफिया गर्ल्स स्कूलमधून १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी दिल्लीती रामजस कॉलेजमधून पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर आयएएसची परीक्षा दिली. या परीक्षेत अभ्यास करून त्यांनी आयएएसची परीक्षा उत्तीर्ण केली. अंजली बिर्ला यांनी भारतीय प्रशासन सेवेत निवड झाल्यानंतर आता महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात काम करण्यास आपले प्राधान्य असेल. तसेच जे काही लक्ष्य दिले जाईल ते पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल असे अंजली बिर्ला यांनी सांगितले.