मुलीसाठी खरेदी करून आणली नवी बाहुली, आत पाहिले तर धक्काच बसला !

गुवाहाटी : त्यांनी मुलीसाठी एक नवीन बाहुली खरेदी करून आणली, जिच्या आत पाहिले असता सर्वांनाच धक्का बसला. हे प्रकरण अमेरिकेच्या एरिझोनातील फिनिक्स येथील आहे. येथील एका जोडप्याने आपल्या मुलीसाठी एक हिरव्या रंगाची सुंदर बाहुली खरेदी केली होती. मुलीचे खेळून झाल्यानंतर जेव्हा जोडप्याने ती धुतली तेव्हा तिच्यातून असे काही बाहेर पडले, ज्यामुळे त्यांची झोपच उडाली. त्या ग्लो वर्म डॉलच्या आतमध्ये एक सँडविच बॅग होती. त्या बॅगमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज निघाल्याने मुलीचे आई-वडील हैराण झाले.

या जोडप्याने बाहुलीच्या आत लपवलेल्या ड्रग्जच्या गोळ्या पाहिल्या तेव्हा ते प्रचंड घाबरले. त्यांनी ताबडतोब फिनिक्स पोलिसांशी संपर्क साधून त्यांना प्रकरणाची माहिती दिली. जोडप्याने सांगितले की, त्यांनी हे खेळणे एल मिराजमधील एका स्टोअरमधून खरेदी केले होते. ते धुतल्यानंतर त्यांना समजले की, त्यामध्ये फेंटनाइल नावाच्या ड्रगच्या गोळ्या आहेत. गोळ्यासुद्धा एक-दोन नव्हे तर तब्बल 5000 निघाल्या होत्या.

पोलिसांनी या घटनेनंतर ताबडतोब कारवाई सुरू केली. सध्या या गोष्टीचा तपास जारी आहे की, अखेर बाहुलीच्या आत इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या गोळ्या आल्या कुठून? परंतु, या घटनेतून धडा मिळतो की, सर्वांनी आपल्या मुलांच्या खेळण्याबाबत किती सावध राहिले पाहिजे. एक छोटी चूकसुद्धा या जोडप्याला खुप महागात पडली असती.