Pune News : मारहाण केल्याचा आरोपावरून प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

पुणे (Pune ) : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गाडीला ठोकरल्यानंतर त्यांनी एकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे (Pune ) जिल्ह्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार शनिवारी रात्री घडला आहे.

याप्रकरणी कैलास सातपुते यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार महेश मांजरेकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, महेश मांजरेकर हे कारने सोलापूरला जात होते. यावेळी यवत येथे आल्यानंतर त्यांनी कारचे अचानक ब्रेक लावले. यावेळी तक्रारदार यांची गाडी त्यांच्या गाडीला जाऊन धडकली. यामध्ये त्यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले. या कारणावरून महेश मांजरेकर यांनी शिवीगाळ करत गालावर चापट मारली असल्याचे कैलास सातपुते यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात महेश मांजरेकर त्या व्यक्तीला काय दारू पिला आहेस का असे विचारताना दिसत आहेत.