Parbhani News : नदीपात्रातील पाण्यात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – घडोळी (ता. जिंतूर) येथील एका शेतकर्‍याचा पुर्णा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (दि. 7) ही दुर्दैवी घटना घडली आहे.

नामदेव मंगू जाधव ( वय 45, रा. घडोळी. ता. जिंतूर) असे मृत्यू पावलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जाधव हे रविवारी सकाळी शेतातील विद्युतपंप सुरु करण्यासाठी गेले होते. पण ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी शोधाशोध करुनही त्यांचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांनी जिंतूर पोलिसात तक्रार दिली होती.

पोलिसांनी शोध सुरु केला होता. घडोळी शिवारातून वाहणाऱ्या नदी पात्रात पोलिसांनी शोध घेतला. मात्र जाधव यांचा शोध लागला नाही. परत सोमवारी (दि. 8) नदीपात्रातील पाणी कमी केले व पुन्हा गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरु केली असता दहाच्या सुमारास जाधव यांचा मृतदेह आढळला. घटनास्थळी पोलिस व महसूल प्रशासनाने धाव घेतले. पोलिसांनी पाण्यातील मृतदेह बाहेर काढला. पंचनामानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बोरळकर, डाॅ. स्वाती अकोशे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. जिंतूर पोलीस तपास करत आहेत.