शेतमालाच्या भावासाठी शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – शेतमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मुलींनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. तहसीलदार या पलीकडे त्याची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे आज शालेय विद्यार्थ्यांच्यावतीने रॅली काढण्यात येणार आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत लोकपाल व लोकायुक्त यांची नियुक्ती, शेतमालाला दीडपट भाव मिळावा यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते. अण्णांचे उपोषण सुरू असतानाच पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलीने शेतमालाला योग्य दर मिळावा, यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे आंदोलन सुरू झालेले आहे. या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. पहिल्या दिवशी ग्रामस्थांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी आंदोलन केलेल्या मुलींशी चर्चा केली. मात्र त्यातून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सदर मुली त्यांच्या आंदोलनावर ठाम राहिल्या. शालेय विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाकडून डोळेझाक करण्यात येत आहे.  प्रशासकीय पातळीवर कोणीही या आंदोलनाची विशेष अशी दखल घेतली नाही.
गेल्या काही महिन्यांपासून पुणतांब्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. शेतकरी क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी वेगवेगळी आंदोलने केली जात आहेत. आता शेतकऱ्यांच्या मुलीच अधिक आक्रमक झाल्या आहेत. या आंदोलनाची प्रशासकीयस्तरावर दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता अधिक वाढविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.