स्टेट बँकेच्या मनमानीविरुद्ध शाखेसमोरच उपोषण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँकेच्या लोणी व्यंकनाथ येथील शाखेच्या कारभाराविरुद्ध रासपाचे जितेंद्र पितळे व इतरांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्राहकांना शाखेत योग्य सुविधा मिळत नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्टेट बँक लोणी व्यंकनाथ येथे छोट्याश्या किंवा कोणत्याही कामासाठी बँकेपुढे उपोषण करावे लागणे, हीच मोठी गंभीर बाब आहे. स्टेट बँकेत  कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना चांगली सेवा दिली जात नाही. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मास्टर सर्क्युलरची अंमलबजावणी केली जात नाही. बँकेच्या अंतर्गत ग्राहक सुविधा केंद्रात एखाद्या खातेदाराने खाते उघडले असल्यास त्या खातेदाराला त्याच केंद्रातून पासबुक छपाई करून घेण्याचा अजब सल्ला या बँकेकडून दिला जात आहे. महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार व रविवार सुट्टी असूनही लोणी येथील  बँक प्रत्येक बुधवारी सुट्टी घेत आहे. यामागचे गौडबंगाल सर्वसामान्य नागरिक, खातेदार ग्राहकांना समजलेच नाही.

तोंड पाहून कर्जवाटप’

तोंड पाहून कर्ज देणारे अधिकारी व कर्मचारी जोपर्यंत सस्पेंड होत नाहीत, तोपर्यंत हे असेच चालणार. CIBIL रिपोर्ट सारखी अत्यंत विश्वासू सुविधा बँकेकडे असूनही त्याचा वापर न करता सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरले जात आहे, असा आरोप पितळे यांनी केला.