लालबाग सिलिंडर स्फोट प्रकरण : बाप-लेकावर सदोष मनुष्यवधाचा FIR दाखल, डिस्चार्ज मिळाल्यानंतर होणार अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लालबाग येथील लग्नघरात झालेल्या सिलिंडर स्फोटास कारणीभूत ठरल्याप्रकरणी बाप- लेकावर काळाचौकी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मंगेश राणे व यश राणे अशी गुन्हा दाखल झालेल्या बाप- लेकांची नावे आहेत. लागबागमधील साराभाई इमारतीत रविवारी घडलेल्या सिलिंडर स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला, तर 14 जण जखमी झाले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणे यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. गॅस गळती झाल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले हाेते. पण काही पावले उचलण्याआधीच स्फाेट झाला. स्फाेटात राणे पिता-पुत्रही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामगार, स्थानिक, नातेवाईक यांचे जबाब नोंदवित आहाेत. दाेघांना रुग्णालयातून सोडल्यानंतर अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. स्फोट होण्याअगोदरच इमारतीतील रहिवाशांना गॅस गळतीची झाल्याचे समजले हाेते. वेळीच याबाबत सतर्कता बाळगली असती तर दुर्घटना टळली असती, अशी माहिती काही जणांच्या जबाबातून समोर आली आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाखांची मदत
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केले आहे.