लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की होणार बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चिक्की म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातमध्ये लोणावळ्याची चिक्की असेल तर मग चिक्की खाण्याची मजा काही औरच असते. मात्र, ही चिक्की आता बंद होणार आहे. लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्कीचे उत्पादक असलेल्या ‘मगनलाल’ चिक्कीपैकी एक ‘मगनलाल फूड प्रोडक्ट्स’ या कंपनीला चिक्कीची उत्पादन करू नये, तसेच त्याची विक्री थांबविण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत.

चिक्कीच्या उत्पादनामध्ये काही त्रुटी आढळल्या असून अन्न व सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याने उत्पादकांना नोटीस जारी करून कारवाई करण्यात आली आहे. ‘लोणावळा येथे शंभर वर्षापूर्वीची जुनी व प्रसिद्ध असलेल्या मगनलाल चिक्कीच्या निर्मात्यांपैकी मगनलाल फूड्स प्रोडक्ट्स या कंपनीची एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी आर. आर. काकडे यांच्यासह पथकाने तपासणी केली. कंपनीचे भागीदार अशोक भरत अगरवाल यांच्या उपस्थितीत केलेल्या तपासणींतर्गत काही त्रुटी आढळल्या आहेत. कंपनी उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांची ‘फूड्स सेफ्टी अॅन्ड स्टॅन्डर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडिया’च्या (एफएसएआय) मान्यताप्राप्त प्रयोगशाळा अथवा स्वतःच्या प्रयोगशाळेत तपासणी करून घेणे आवश्यक होते.

मात्र, कंपनीने उत्पादित खाद्यपदार्थाची कोणतीच चाचणी तसेच तपासणी केली नसल्याचे आढळून आले आहे. त्यातून खाद्यपदार्थ मानवी सेवनास सुरक्षित असल्याची कोणतीही खात्री किंवा हमी नसल्याने विक्रीसाठी उत्पादित केलेला कोणताही खाद्यपदार्थ हा मानवी सेवनासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासल्याशिवाय त्याची विक्री करू नये असे आदेश दिले आहेत,’ अशी माहिती एफडीएने दिली.

कायद्यानुसार अटींची पूर्तता केल्यानंतरच उत्पादन व विक्री करता येईल.

अन्न व सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम ५५ नुसार त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित कंपनीच्या प्रत्येक संचालकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.