आयपीएलची फायनल फिक्स?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात येत्या २५ मे रोजी आयपीएलची फायनल रंगणार असल्याचे सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना, पण ते खरं आहे. कारण क्वालिफायर दोनचा सामना अजून बाकी असतानाच चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील अंतिम सामन्याचा प्रोमो व्हायरल झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारा सामना फिक्स आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर जर क्वालिफायर दोन फिक्स असेल तर फायनलही फिक्स असावी, अशी चर्चा सुरु झाली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने बुधवारी एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थानला २५ धावांनी पराभूत केले. या विजयासह त्यांनी ‘क्वालिफायर-२’ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता ‘क्वालिफायर-२’ मध्ये त्यांना सनरायझर्सचा सामना करावा लागणार आहे. पण या ‘क्वालिफायर-२’ मध्ये कोलकाता हैदराबादला पराभूत करून अंतिम फेरीत जाणार, कारण यंदाच्या आयपीएलचा अंतिम फेरीचा सामना फिक्स आहे, असे सांगणारा एक व्हीडीओ सोशल मीडियामध्ये वायरल झाला आहे.

सोशल मीडियामध्ये वायरल झालेल्या या व्हीडीओमध्ये यंदाच्या आयपीएलच्या अंतिम फेरीचा प्रोमो दाखवला गेला आहे. या प्रोमोमध्ये आयपीएलच्या अंतिम फेरीत चेन्नई आणि कोलकाता एकमेकांशी दोन हात करणार असल्याचं दाखवलं गेलं आहे. ‘ क्वालिफायर-2 ‘मध्ये कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील लढत अजूनही बाकी असताना हा व्हीडीओ वायरल झाल्याने सर्वांनाच आश्चयार्चा धक्का बसला आहे. पण या व्हिडिओ कोणी केला़ अथवा त्याची सत्यता काय हे पडताळून पाहण्यात आलेले नाही.