Pune : फुरसुंगी कचरा डेपोला भीषण आग; 6 तास उलटूनही आग धुमसतीच, आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु

फुरसुंगी : पोलीसनामा ऑनलाईन –   उरुळीदेवाची येथील कचरा डेपोला शुक्रवारी (दि. 2) दुपारी दीडच्या सुमारास आग लागली आहे. सायंकाळी वाऱ्याच्या वेगाने आग भडकत गेल्याने सुमारे 12 ते 15 एक परिसरावर पसरली आहे. गेल्या सहा तासापासून 4 आगीच्या बंबाने आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र ती आटोक्यात येत नाही. दरम्यान ही आग कशी लागली असा सवाल कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे भगवान भाडळे यांनी केला आहे. हे पुणे महापालिकेचे षंडयंत्र असल्याचा आरोप भाडळे यांनी केला आहे.

गेल्या 25 वर्षात अनेकदा कचरा डेपोत आगीच्या घटना घडल्या. मात्र शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीचे स्वरूप भीषण आहे. जो कचरा ओपन डम्पिंग केला आहे. तो जिरवायचा आहे. दोन्ही गावावर जो अन्याय केला आहे. तो सहन केला जाणार नाही असा इशारा नगरसेवक गणेश ढोरे यांनी सांगून निषेध व्यक्त केला आहे. धुराचे लोट वाढत असल्याने डेपोच्या लगत राहणा-या लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे. डेपो शेजारुन जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनचालकांना धुराचा त्रास होत आहे. सारखी आग लागतेच कशी असा सवाल ढोरे यांनी केला आहे. ओपन डम्पिंग केलेला कचरा जिरवण्यासाठी ही आग लावली आहे. या डेपोच्या नावावर कोट्यावधी खर्च होत आहेत. 2 तासात ही आग आटोक्यात आणली पाहिजे, पुणे महापालिकेकडे तेवढी यंत्रणा नाही का असा सवाल ढोरे यांनी केला आहे.