‘सीरम’मधील आगीची घटना, दुर्घटना की घातपात ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या संस्थेत आग लागली कशी ? याचा शोध घेतला जात आहे. येथे लागलेली आग ही दुर्घटना की घातपात ? यावर आता तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्याचवेळी सोशल मीडियावरही याच मुद्यावर चर्चा झडत आहेत. येथील आगीचे छायाचित्रे सोशल मीडिया’वर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी दुपारपासूनच घटनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली.

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाचे लक्ष सीरमच्या कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लशीकडे लागले होते. देशभरात 12 जानेवारीपासून या लशीचे वितरण सुरू झाले. असे असताना अवघ्या नऊ दिवसात सीरमच्या मांजरी प्रकल्पात आग लागल्याची घटना घडली. एकीकडे लसीचे वितरण आणि ही घटना, यांचाही काही संबंध आहे का, यादृष्टीने तपास सुरु आहे. जगातील 170 देशांना विविध स्वरूपाच्या आजारांवरील लस पुरविणाऱ्या या संस्थेत आग लागली कशी ? याचा शोध घेतला जात आहे. येथे धूम्रपानास बंदी आहे, तिथे मोबाईलदेखील नेता येत नाही. तेव्हा, आगीचे कारण नेमके काय असेल, हे सर्व पातळ्यावर तपासले जात असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीरमच्या स्थापनेपासून म्हणजे, 1966 पासून आतापर्यंत संस्थेत किरकोळ आगीच्या घटना घडल्या; मात्र, एवढी भीषण आग पहिल्यांदाच लागल्याची माहिती संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.