१५ भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अग्निशमन गाडी चालक गंभीर

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. घोरपडे पेठेत शनिवारी रात्री साडे दहाच्या वाजण्याच्या दरम्यान १२ ते १५ भटक्या कुत्र्यांनी अग्निशन गाडी चालकावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून औषधोपचार केले आहेत.

सतीश श्रीसुंदर (मनपा,वसाहत क्र. ८ घोरपडे पेठ) असे हल्ल्यात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना नागरिकांनी दवाखान्यात दाखल केले. या हल्ल्यात त्यांचा हात मोडला असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार , सतीश श्रीसुंदर हे गेली २० वर्ष अग्निशामक दलात फायर इंजिन चालक म्हणून कार्यरत आहेत. ते शनिवारी रात्री ऍक्टिवा दुचाकीवरून घरी जात होते. मनपाजवळ घोरपडे पेठ येथे एका नागरिकानी भटक्या कुत्र्यांना मांसाचे तुकडे खायला घालून तो निघून गेला होता. काही वेळात श्रीसुंदर त्या ठिकणावरून जात असताना एक कुत्रा त्यांच्या मागे लागला ते घाबरून थांबले असता बाकी १५-२० कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. यामध्ये ते गाडीवरून खाली पडल्याने त्यांचा हात मोडला, कुत्र्यांनी त्यांचा हात ,पाय ,पोट इत्यादी ठिकाणी चावा घेतला. सतीश यांनी आवाज दिल्याने बाजूचे लोक धावत आले ,लोकांना पाहून कुत्रे तेथून पळून गेले.यानंतर लोकांनी सतीश यांना तेथील शारदा क्लीनिक येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्या हाताला प्लास्टर केले. यानंतर त्यांना नायडू हॉस्पिटल मध्ये दाखल केले असून त्यांच्यावर योग्य तो उपचार केला आहे.

दरम्यान, भटक्या कुत्र्यांना पिशवीत आणलेले मांसाचे तुकडे टाकल्याने ते रात्री कुणीही पिशवी घेऊन जाताना मांस समजून त्यांच्यावर हल्ला करतात. त्यामुळे असे मांस खाऊ घालणारांवर बंदी घालायला हवी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तसेच कुत्र्यांचे वाढते हल्ले लोकांसाठी त्रासदायक ठरत असून महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायला हवा अशीही मागणी लोकांकडून समोर येत आहे.