दिलासादायक ! राज्यातले पहिले शासकीय IVF केंद्र नागपुरात

पोलीसनामा ऑनलाईन : वंधत्व निवारणासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) पुढाकार घेतला असून पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यातील पहिले शासकीय आयव्हीएफ (इन व्रिटो फर्टिलिटी) केंद्र उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्याच्या इतरही भागात वैद्यकीय शिक्षण खात्याकडून हे केंद्र तयार केले जाणार आहेत. सध्या आयव्हीएफ उपचार पद्धती केवळ खासगी रुग्णालयांत उपलब्ध आहे. राज्यातील एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत ही सुविधा नाही. मध्य भारतातील महिलांना दिलासा देण्यासाठी मेडिकलमध्ये हे केंद्र तयार करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आई होणे प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाची गोष्ट असते. परंतु काही समस्यांमुळे काही स्त्रियांच्या गर्भधारणेत अडचणी येतात. त्यांच्यातील वंधत्वाची समस्या सोडवण्यासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने राज्यातील पहिले शासकीय आयव्हीएफ केंद्र तयार करत आहे. अनुवंशिक व इतर काही कारणाने आई न होऊ शकणाऱ्यांना आयव्हीएफ पद्धतीने उपचार देऊन मातृत्वाचे सुख देता येऊ शकते. या प्रकल्पासाठी 2020-21 या आर्थिक वर्षांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 95 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून येथे या केंद्रासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीसह इतरही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करत अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या सूचनेनुसार कामही सुरू झाले आहे.

पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूरच्या मेडिकलमध्ये राज्यातील पहिले आयव्हीएफ केंद्र तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा अभ्यास करून ते इतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत तयार केले जाणार आहे.
– डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.

सध्या 25 ते 35 टक्के महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणेस अडचण येऊ शकते. वंधत्वावर आयव्हीएफ पद्धती फायद्याची आहे. परंतु त्यासाठी तज्ज्ञांचे निरीक्षण, अद्ययावत पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत.
– डॉ. चैतन्य शेंबेकर, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, नागपूर.