कौतुकास्पद ! TV वर अँकरच्या रूपात पहिल्यांदाच झळकली ट्रान्सजेंडर, इतिहास रचताच अश्रू अनावर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या सोशल मीडियावर बांग्लादेशच्या एका अँकरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. त्याला कारणंही तसंच खास आहे. कारण सदर अँकर महिला किंवा पुरुष नाही तर एक ट्रान्सजेंडर आहे. बांग्लादेशच्या नॅशनल न्युज चॅनलवर जेव्हा या महिलेनं न्यूज वाचायला सुरुवात केली तेव्हा सारे पहातच राहिले.

तश्रृवा आनन शिशिर असं या ट्रान्सजेंडर महिलेचं नाव आहे. तिनं बुलेटीन पू्र्ण केल्यानंतर तिचा आणि सहाकारीवर्गाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिलाही अश्रू अनावर झाले होते. बांग्लादेशात जवळपास 1.5 मिलियन ट्रान्सजेंडर राहतता. हे लोक मोठ्या प्रमाणात हिंसा आणि भेदभावाचा सामना करतात. पोट भरण्यासाठी भीक मागणं, शरीर संबंध, व्यापार, अगदी गुन्हा करण्यासही ते प्रवृत्त होतात.

बोइशाखी टीव्ही या खासगी टीव्हीपासून तश्रृवा आनन शिशिरनं आपल्या अँकरींगची सुरुवात केली. ती म्हणाली की, जन्मल्यानंतर किशोरवस्थेत असताना मला मी ट्रान्सजेंडर असल्याची जाणीव झाली. मलाही लोकांच्या अत्याचाराचा सामना करावा लागला होता. इतकंच नाही तर 4 वर्षांपूर्वी मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. माझ्या वडिलांनी अनेक वर्षांपासून माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. त्यानंतर मी घर सोडलं आणि राजधानी ढाकामध्ये येऊन राहिले.

पुढं बोलताना ती म्हणाली, तिथं मी हार्मोन थेरपीचं काम केलं आणि पोट भरायला सुरुवात केली. नंतर सिनेमागृहांमध्येही नोकरी केली. यासोबत माझा अभ्यासही सुरु होता. जानेवारी महिन्यात ढाका येथील जेम्स पी ग्रांटस्कुल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये सार्वजनिक आरोग्य या विषयावर अभ्यास करणारी मी पहिली ट्रान्सजेंडर ठरले. अँकर होण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये मुलाखती दिल्या होत्या, परंतु नकार मिळाल्याचंही तिनं सांगितलं.