यवतमाळ : दारूची हौस भागवण्यासाठी त्यांनी प्राशन केलं सॅनिटायझर? 5 जणांचा मृत्यू

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – दारुची तल्लफ भागवण्यासाठी दारु म्हणून सॅनिटायझर प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडली आहे. या घटनेने यवतमाळ जिल्हा हादरला आहे. दरम्यान या वृत्ताला वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनीही दुजोरा दिला आहे.

दत्ता लांजेवार (वय 47), नूतन पाथरटकर (वय 33), गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे (सर्व रा. वणी,जि. यवतमाळ) अशी मृतांची नावे आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे दारुची दुकाने बंद असल्याने तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझर प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दत्ता लांजेवार यांनी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सॅनिटायझर प्राशन केले. त्यानंतर घरी आल्यावर रात्री दहा वाजता त्याच्या छातीत त्रास सुरु झाला. त्यानंतर असह्य वेदना होत असल्याने त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु रात्री अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. तसेच नुतन पाथरटकर याचाही सॅनिटायझर पिऊन मृत्यू झाला. तसेच एकतानगर इथल्या संतोष मेहर सुद्धा सॅनिटायझर प्यायला आणि पहाटे घरीच मृत्यू झाला. गणेश नांदेकर याचाही रात्री सॅनिटायझर प्यायल्याने घरीच मृत्यू झाला आहे. तर सुनील ढेंगळे यांनीही सॅनिटायझर पिऊन जीव गमावला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.