नव्या स्ट्रेनमुळे चिंता वाढली, ब्रिटनहून आलेले 5 प्रवासी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पोलीसनामा ऑनलाईन – ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणुमूळे जगभरात चिंता वाढली असतानाच लंडनहून सोमवारी (दि. 21) रात्री दिल्लीत आलेल्या एका प्रवासी विमानातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या पाचही प्रवाशांना केअर सेंटरमध्ये पाठवले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी NCDC ला पाठवले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच या रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन आहे का? हे स्पष्ट होणार आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळला आहे. या नव्या विषाणूमुळे अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याने येथे पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केला आहे. या विषाणूमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटनबरोबरची हवाई सेवा स्थगित केली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस ब्रिटनमधून एकही विमान भारतात येणार नाही आणि भारतातून एकही विमान ब्रिटनसाठी उड्डाण करणार नाही. पूर्वानुभव लक्षात घेता, खबरदारी म्हणून भारत सरकारने ही पावले उचलली आहेत.

सोमवारी रात्री दिल्ली विमानतळावर लँडिंग झालेले विमान लंडनहून आले होते. विमानात एकूण 266 प्रवासी आणि क्रू मेंबर्सपैकी पाच जणांना करोनाची बाधा झाली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन आहे का? ते अजून स्पष्ट झालेले नाही. तपासणी आणि संशोधनानंतरच ते स्पष्ट होणार आहे. लंडनमध्ये या नव्या स्ट्रेनचे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकारकडून सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.