भाजप नगरसेवक कामाठीसह 5 जण दोन वर्षांसाठी तडीपार ?

पोलिसनामा ऑनलाईन, सोलापूर – शहरामध्ये अवैधरित्या मटका व्यवसाय चालविल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक सुनील कामाठी ( bjp corporator kamathi)  (रा. न्यू पाच्छा पेठ), इस्माईल बाबू मुच्छाले (रा. मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदाशा मदार चौक), शंकर चंद्रकांत धोत्रे (रा. भगवान नगर झोपडपट्टी), नवनाथ भिमशा मंगासले (रा. मुस्लिम पाच्छा पेठ), हुसेन सैपनसाब शेख (रा. मुस्लिम पाच्छा पेठ) यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश आज पोलिस आयुक्तालयाने दिलेत. हे मुंबई- कल्याण नावाचा अवैध मटका जुगार चालवत होते.

शहरातील गुंड प्रवृत्तीचे लोक तथा गुन्हेगारांसह काही नगरसेवकांना याअगोदर शहर पोलिस आयुक्तालयाने हद्दपार तथा तडीपार केलंय. काहींवर एमपीडीएअंतर्गत कारवाई ही केलीय. त्यावेळी आयुक्तालयाच्या प्रेसनोटमध्ये पोलिस आयुक्त, उपायुक्तांसह परिमंडळ अधिकार्‍यांची नावे असायची. मात्र, भाजप नगरसेवक सुनील कामाठीसह अन्य चौघांना अवैधरित्या मटका व्यवसाय केल्याप्रकरणी 2 वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून तडीपार करण्याचे आदेश आयुक्तालयाने आज काढलेत. मात्र, या ऑर्डवर कोणत्याही अधिकार्‍याची स्वाक्षरी नसून कारवाई केलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांची नावेदेखील नसल्याचे दिसून येत आहे.

अवैधरित्या मटका व्यवसायप्रकरणी पोलिसांनी 100हून अधिकजणांविरुध्द कारवाई केलीय. त्यातील कामाठी, मुच्छाले, धोत्रे, मंगासले, शेख या 5 जणांना सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून तडीपार केले आहे. दोन वर्षांसाठी हे आदेश असल्याचेही पोलिस आयुक्तालयाने त्यांच्या आदेशातून स्पष्ट केलंय. पोलिस उपायुक्त परिमंडळ कार्यालयातील वाचक अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक एन. एस. कानडे यांनी आदेश काढलेत. मात्र, त्यावर कोणत्या अधिकार्‍याची स्वाक्षरी नाही.