आयआयटी पासआऊट वृध्द भीक मागताना दिसतो तेव्हा…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ही घटना आहे मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथील. एक ९० वर्षी वृद्ध थंडीने कुडकुडत होते. गल्लीगल्लीमध्ये भीक मागून ते रस्त्याच्या कडेला राहत होते. त्यांची प्रकृती खूप खराब होती. तिथे जाऊन त्यांची चौकशी केली. तेव्हा आयआयटी कानपूर पासआऊट असल्याच समजलं आणि धक्काच बसला. त्यांचे नाव सुरेंद्र वशिष्ठ आहे आणि वय जवळपास ९० असल्याचं त्यांनी सांगितलं.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आयआयटी पासआऊट सुरेंद्र यांना एका संघटनेने मदत केली आहे. याच संघटनेने मनीष मिश्रा यांनाही मदत केली होती. आश्रम स्वर्ण सदनसोबत असलेल्या विकास गोस्वामी यांनी सांगितले की, आम्ही सुरेंद्र यांना बस स्टँडजवळ खूप वाईट परिस्थितीत पाहिले. त्यांच्यासोबत जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी इंग्रजीत बोलण्यास सुरुवात केली. त्यांना आम्ही समजावून आश्रमात घेऊन आलो. त्यांच्या घरच्यांशीही बोलायचा आम्ही प्रयत्न केला. सुरेंद्र यांनी आश्रमातील लोकांना सांगितले की, १९६९ मध्ये त्यांनी कानपूरमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला होता. १९७२ मध्ये त्यांनी एलएलएम केले होते. त्यांचे वडील जेसी मिलमध्ये सप्लायर होते. ही कंपनी नंतर बंद पडली.

या घटनेची पुनरावृत्ती ग्वाल्हेरमध्ये घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरमधील पोट निवडणुकीच्या मतमोजणी नंतर दोन पोलीस अधिकारी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर परतत होते. त्याचवेळ त्यांना रस्त्याच्या कडेला थंडीने कुडकुडत असलेला एक भिकारी दिसला. पोलिसांनी गाडी थांबवली. त्या व्यक्तीला जॅकेट दिलं, बूट दिले. भिकाऱ्याची अवस्था पाहून त्यांन तो मनोरुग्ण असल्याचं समजलं. पोलिसांना यापूर्वी या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखंही सतत वाटत होतं. चौकशी केल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. कारण हा भिकारी त्यांच्याच बॅचचा पोलीस ऑफिसर असल्याचं त्यांना आठवले होते. ही व्यक्ती मनीष मिश्रा होती.

मनीष मिश्रा हे १९९९ सालच्या बॅचचे ते पोलीस अधिकारी होते. त्या वेळी अचूक नेम साधणारा निशाणेबाज म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी मध्य प्रदेशात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी म्हणून काम केलं. डीएसपी रत्नेश तोमर आणि विजय भदौरिया यांना रस्त्यात भिकारी दिसला होता. मनीष मिश्रा असं या व्यक्तीचं नाव आहे. ते गेली १० वर्षं अशाच अवस्थेत फिरत आहेत. २००५ च्या सुमारास त्यांना मानसिक त्रास सुरू झाला. या आजाराने त्यांची मानसिक स्थिती बिघडली. आता ते देखील याच संस्थेच्या मदतीने बरे होत आहेत.