Pune News : पुण्यातील बजाज फायनान्सवर RBI ची मोठी कारवाई, केला 2.5 कोटींचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (reserve bank of india) नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नॉन-बँकिंग वित्तीय सेवा देणारी कंपनी बजाज फायनान्सवर (NBF Bajaj Finance) मोठी कारवाई केली आहे. बजाज फायनान्स कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने कंपनीला तब्बल अडीच कोटी रुपयांचा दंड केला आहे. दंडाची कारवाई करताना आरबीआयने  (reserve bank of india)  म्हटले आहे की, कंपनीच्या विरोधात फेअर प्रॅक्टिस कोड (FPC) चे उल्लंघन केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीत नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला हा दंड लावण्यात आला आहे.

आरबीआयने जारी केलेल्या जोखीम व्यवस्थापन आणि अचारसंहितेच्या सूचनांचे बजाज फायनान्स पुणे यांच्याकडून उल्लंघन केले आहे. तसेच कंपनीबाबत ग्राहकांकडून रिकव्हरी आणि कलेक्शनसाठी (Recovery & Collection Methods) चुकीच्या पद्धतीच्या वारंवार तक्रारी येत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. याशिवाय कंपनीने सर्व एनबीएफसींसाठी लागू केलेल्या फेअर प्रॅक्टिस कोडकडे देखील दुर्लक्ष केले. आरबीआयने अधिनियम 1934 (RBI Act) अंतर्गत ही कारवाई केली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार कंपनी हे सुनिश्चित करु शकली नाही की, त्यांच्या रिकव्हरी एजंटकडून वसुलीवेळी ग्राहकांना त्रास सहन करावा लागला नाही.

आरबीयाने दंडाची कारवाई करण्यापूर्वी बजाज फायनान्सला कारणे दाखवा नोटीस बाजावली होती. या नोटीसीमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास कंपनीवर दंड का आकारला जाऊ नये, अशी विचारणा या नोटीसमधून करण्यात आली होती. त्याला उत्तर दिल्यानंतर केंद्रीय बँकेने कंपनीला दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरांवर आधारित असल्याचे आरबीआने म्हटले आहे. तसेच या कारवाईचा कंपनीने ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारावर किंवा करारावर वैधतेवर शंका घेण्याचा कोणताही हेतू नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.