उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचे आयुक्तांकडून कौतूक 

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन – पोलीस आयुक्तालयात झालेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या १२ टीमचा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली घाडगे, उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, डॉ. अनिता जमादार, ज्ञानोबा मुंडे, रामचंद्र गायकवाड, हनुमंत भापकर यांची उपस्थिती होती.

गेल्या काही दिवसांत काही पोलीस ठाण्यांनी विशेष कामगिरी करत महत्त्वपूर्ण गुन्हे उघडकीस आणले. आयुक्तालयातील काही शाखांचेही काम उल्लेखनीय ठरले. या सर्व टीमचा पोलीस आयुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यामध्ये मुकुंदवाडीतील खुनाचा उलगडा करत आरोपीला अटक केली, मोक्का आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी इम्रान मेंहदीला पळवून नेण्याचा कट उघडकीस आणून आरोपींना अटक केली, ७ घरफोड्या उघडकीस आणल्या तर हर्सूल भागातून १९ तलवारी जप्त केल्या.

गुन्हे शाखेच्या सर्व टीमचा सत्कार करण्यात आला. २०१८ मध्ये ऑनलाईन फसवणूक झालेल्या तक्रारदारांचे १० लाख ११ हजार ९८८ रुपये परत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक हेमंत तोडकर, पोशि विवेक औटी, सुदर्शन एखंडे, रेवननाथ गवळे, नितीन देशमुख यांचा सत्कार केला. सातारा परिसरात दोन वर्षांपासून मंगळसूत्र चोरणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून ४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याबद्दल पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, उपनिरीक्षक चेतन ओगले, सहायक फौजदार चौहान, सानप, पोहेकॉ चव्हाण, एम. चव्हाण, ससाणे, शेख, लांडे यांचा सत्कार केला. तर मागील पाच महिन्यांपासून उघडकीस न आलेला खुनाचा गुन्हा उघड करणे, २१ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल सिडकोच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक भरत पाचोळे, पोहेकॉ नरसिंग पवार, राजेश बनकर, दिनेश बन, प्रकाश ठोंबरे, संतोष मुदिराज, सुरेश सिसे, किशोर गाडे यांचा सत्कार केला.

समाजकंटकांच्या तावडीतून दोन मुलांची सुटका करणारे सिटीचौक पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ रियाजोद्दीन अहेमदोद्दीन तर जखमी व्यक्तीला तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणारे वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोशि शिवराज बिरारे, १६ पैकी १६ गुन्ह्यांत दोषसिद्धी केल्यामुळे दौलताबाद पोलीस ठाण्याचे पैरवी कर्मचारी गौरख गोल्हार आणि घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल एम. सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाले, सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.

जाहिरात