Forbes : फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारमण यांचा समावेश, जाणून घ्या इतर नावे

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – फोर्ब्सने २०२० ची जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. मध्ये ३० देशांमधील महिलांचा समावेश असून, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ आणि एचसीएल इंटरप्राईजच्या सीईओ रोशनी नडार मल्होत्रा यांचा समावेश आहे. यादीमध्ये सलग दहाव्या वर्षी जर्मनीच्या चान्सलर एजेंला मर्केल अव्वल स्थानी आहेत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. ज्यांनी कडक नियमावली करत आपल्या देशाला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून वाचवलं.

जाहीर करण्यात आलेल्या सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत दहा देशांच्या प्रमुख, ३८ सीईओ आणि पाच मनोरंजन क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. भलेही त्या वयाने, राष्ट्रीयतेने आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील. मात्र, २०२० वर्षात आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे काम केलं असल्याचे फोर्ब्सनं म्हटलं आहे.

निर्मला सीतारमण ४१ व्या स्थानी
या यादीमध्ये निर्मला सीतारमण ४१ व्या स्थानी आहेत. नडार मल्होत्रा ५५ व्या तर किरण मजुमदार शॉ ६८ व्या स्थानी आहेत. लॅंडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतियानी या यादीत ९८ व्या स्थानी आहेत. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस तिसऱ्या स्थानी आहेत.

मर्केल यांनी आर्थिक संकटातून सावरलं
फोर्ब्सनं म्हटलं आहे की, जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल युरोपातील प्रमुख नेत्या आहेत. जर्मनीला आर्थिक संकटातून सावरत त्या क्षेत्रातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेचं त्या नेतृत्व करत आहेत. त्यामुळे यादीत त्या सलग दहाव्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत.

तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन ३७ व्या स्थानी
कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले. तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांनी जानेवारी महिन्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यासाठी एक कार्यक्रम लागू केला. त्यामुळं आज 2.3 कोटी लोकसंख्येच्या या देशात केवळ 7 मृत्यू कोरोनामुळं झाले आहेत. त्यांनी केलेल्या कामामुळे राष्ट्रपती साई इंग वेन ३७ व्या स्थानी असल्याचे फोर्ब्सनं सांगितलं.

शेख हसीना ३९ व्या स्थानी
यादीत बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सहअध्यक्षा मिलिंडा गेट्स (पाचवं स्थान), अमेरिकन सदनाच्या स्पीकर नैंसी पेलोसी (सातवं स्थान), फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सॅंडबर्ग (२२व्या स्थानी), बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (३९व्या स्थानी), ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय (४६ व्या स्थानी), सुप्रसिद्ध कलाकार रिहाना (६९व्या स्थानी) आणि बेयोंसे (७२ व्या स्थानी) यांचादेखील समावेश आहे.