Nanded News : शंकर नागरी सहकारी बँकेची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी गजाआड

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –  बँक खाते हॅक करुन साडे चौदा कोटी रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली होती. नांदेडच्या शंकर नागरी सहकारी बँकेतील खात्यामधून हॅकरने साडे चौदा कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले होते. या प्रकरणी शंकर नागरी बँकेने वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले होते. पथकाने सायबर सेलच्या मदतीने तांत्रीक तपास करुन टोळीला धारवाड येथून अटक केली आहे.

रुमानीका रोनॉल्ड पी. किटासीबवा (वय-22 रा. म्परवे कम्पका, युगांडा), आयव्ही मोनुके केनेडी नयबुतो (वय-24 रा. महाली आयसीपो, केनीया), गलाबुजी मुकीसा रॉबर्ड पि. गलाबुजी फेड (वय-23 रा. बुसुकुमा किवेंडा, युगांडा), प्रिया पी. गोविंदअप्पा सावनुर-माळवदे (वय-36 रा. मयुरी इस्टेट, मवुअप्पा विलीगी प्लॉट्स, केशवपुरी, हुबळी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नांदेडमधील शंकर नागरी सहकारी बँकेतून 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपये संशयास्पद रित्या वळवण्यात आले होते. 2 जानेवारी रोजी बँक व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन कर्नाटक जिल्ह्यातील धारवाड येथे पाठवण्यात आले होते. या पथकाने सायबर सेलच्या तांत्रीक मदतीने आरोपींना धारवाड येथील हु.मु. सय्यद रेसिडन्सी कॉस गिरीनगर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2 लॅपटॉप, 6 मोबाइल, 2 डोंगल, 8 चेकबुक, 5 पासबुक, 13 डेबीट कार्ड जप्त केले. पुढील कारवाईसाठी आरोपींना वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी.जी. चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल नाईक, संतोष शेवडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंडेराव करले, पोलीस नाईक गंगाधर कदम, अफज़ल पठाण, पोलीस कॉन्स्टेबल देवासिंग चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल कोवे, पवार, गोरे यांच्या पथकाने केली.