ब्रिटनमध्ये वंशवाद : राज्यसभेत परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले – ‘योग्य ठिकाणी आवाज उठवू’

नवी दिल्ली : ब्रिटिश संसदेत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून झालेल्या चर्चेनंतर भारताने उत्तरादाखल कारवाई केली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी राज्यसभेत ब्रिटनेमध्ये वाढत असलेल्या वंशवादाचा मुद्दा मांडला. परराष्ट्र मंत्री म्हणाले, जर आवश्यकता भासली तर वंशवादाचा मुद्दा योग्य प्लॅटफॉर्मवर मांडू.

काही दिवसांपूर्वीच एका भारतीय विद्यार्थीनीला ऑक्सफर्ड विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. विद्यार्थीनी रश्मी सामंतच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट वायरल झाल्यानंतर तिच्यावर निशाणा साधण्यात आला, ज्यानंतर रश्मीला राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर भाजपा खासदार अश्विनी वैष्णव यांनी संसदेत भारतीय विद्यार्थीनीला राजीनामा द्यावा लागल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटले की, ब्रिटनमधील वंशवादाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, अशावेळी गरज भासली तर हा मुद्दा योग्य ठिकाणी मांडला जाईल.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी राज्यसभेत म्हटले की, आम्ही महात्मा गांधींच्या देशातील लोक आहोत, अशावेळी वंशवादावर आम्ही आमचे डोळे बंद करून बसणार नाही. ते सुद्धा अशा देशात जिथे मोठ्या संख्येने भारतीय राहतात. ब्रिटनसोबत आमचे चांगले संबंध आहेत, जर एखादे प्रकरण समोर आले तर त्यावर अ‍ॅक्शन घेतली जाईल.

काय आहे प्रकरण
भाजपा खासदार अश्विनी वैष्णव यांनी संसदेला सांगितले की, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत भारतीय विद्यार्थीनी रश्मी सामंतबाबत जे झाले, ते चुकीचे होते. रश्मी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघाची अध्यक्ष निवडली गेली होती, परंतु तिच्या काही जुन्या सोशल मीडिया पोस्ट वायरल झाल्यानंतर तिला निशाणा बनवण्यात आले आणि शपथ घेण्यापूर्वीच तिला राजीनामा द्यावा लागला.