मनोहर पर्रीकरांची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्णच

पणजी : गोवा वृत्तसंस्था – १९९४ साली राजकारणात सक्रिय झालेल्या आणि तेव्हा पासून शेवटच्या श्वासापर्यंत सक्रिय राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांनी २०१७ साली दिलेल्या मुलाखतीत एक इच्छा बोलून दाखवली होती. मी राज्याच्या आणि लोकांच्या विकासासाठी खूप काही केले आहे. मात्र मला आता स्वतःसाठी जगायचे आहे. मुख्यमंत्री पदाचा हा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पक्षाने कितीही दबाव टाकला तरी आपण राजकारणातून निवृत्त होणार आहे असे पर्रीकर यांनी म्हणले होते.

आपल्याला आपल्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे स्वतःसाठी खर्ची घालवायची आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर पक्षाने आपल्यावर कितीही दबाव आणला तरी आपण निवडणुकीचा भाग होणार नाही असे पर्रीकर म्हणाले होते. मात्र त्यांची इच्छा अपूर्ण राहिली आहे. मुख्यमंत्री पदावर असतानाच पर्रीकर यांना अकाली मृत्यूने गाठल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मनोहर पर्रीकर याना स्वादुपिडाचा कर्करोग झाला होता. त्या आजारामुळे ते मागील काही महिन्यापासून त्रस्त होते. अखेर काल रविवारी त्यांची मृत्यूशी सुरु असणारी झुंज अखेर संपली आहे.

गोव्यातील मापुसा येथे गौर सारस्वत ब्राम्हण कुटुंबात मनोहर पर्रीकर यांचा जन्म झाला होता. १९८९ मधील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला अवघे १% मतदान मिळाले होते. त्याच भाजपला मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाने सत्तेच्या शिखरावर नेवून पोचवले होते. युवा अवस्थेत असल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळले गेलेले मनोहर पर्रीकर संघाचे अत्यंत निष्ठावान स्वयंसेवक म्हणून गणले जात होते. त्यांनी आपल्या आयुष्यात साध्या राहणीला महत्व दिल्यामुळे त्यांना गरिबांचे मुख्यमंत्री म्हणून देखील संबोधले जात होते.