माजी आमदार संजय बंड यांचे हृदय विकाराने निधन

अमरावती : पोलीसनामा आॅनलाइन – वलगाव मतदार संघातील माजी आमदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांचे रात्री हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अचानक अशाप्रकारचे वृत्त समजल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राला धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे. बंड हे वलगाव मतदार संघातून सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संजय बंड हे अमरावती जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीसाठी झटणारे नेते होते. एक प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची या भागात ओळख आहे. रात्री उशीरा अचानक बंड यांच्या निधनाचे वृत्त येऊन धडकले. अनेकांना या वृत्ताने धक्का बसला. राजकीय नेते, कार्यकर्ते यांना त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले होते. सध्या येथील वातावरण शोकाकुल आहे.